शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया पारदर्शी व शासकीय नियमाने व्हावी ; अशाराणी पाटील.
स्टोन क्रशर, दगड, वाळू, माती, मुरूम, बेसमेंट उत्खनन मलईची चव जाता जाईना, तोंडाला सुटलेले पाणी थांबवता येईना ?
कोल्हापूर/शिरोळ/हातकणंगले : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील सर्व बदली पात्र कर्मचारी यांना कोणतीही मुदतवाढ देवू नये किंवा वशिलेबाजी ने त्याच कार्यालयात बदली करू नये. अन्यथा मुदतवाढ व वशिलेबाजीने बदली प्रक्रिया विरोधी न्यायालयात दाद मागण्यात येईल.अशा आशयाचे निवेदन जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती आशा राणी पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे याचबरोबर बदली प्रक्रियेविषयीचे निवेदन पुणे महसूल आयुक्त व उपायुक्त यांना पाठविण्यात आले आहे.
प्रामुख्याने शिरोळ व हातकणंगले या दोन तालुक्यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ओळखले जाते. या दोन तालुक्यातील मलई कितीही ओरबडली तरी संपत नसल्याची चर्चा आहे, त्यामुळे यापूर्वी या दोन तालुक्यात ठाण मांडून बसलेल्या ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय आस्थापना, पुरवठा, निवडणूक, संजय गांधी निराधार विभागातील वरिष्ठ लिपिक इचलकरंजी उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपली बदली या दोनच तालुक्यात व्हावी अशी मंत्रालय पातळीवर आणि राजकीय नेते मंडळींमार्फत फिल्डिंग लावत असल्याचे समजून येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
जयसिंगपूर शहरात अपार्टमेंटचे बांधकाम करीत असताना, बेसमेंट करिता जेवढे जेवढे खोदकाम करण्यात आले, त्या खोदकामांमध्ये अधिकार असलेल्या एका काळ्याचे पांढरे करणाऱ्या व्यक्तीने 70 लाखाहुन अधिक रुपयांची कमाई केल्याची चर्चा असल्याचे पाटील म्हणाले.
गेल्या एक वर्षापासून कृष्णा नदी पात्रात व कृष्णा काठावर संगनमताने वाळू आणि माती उपसा करण्यात आला, यामध्ये एक, दोन तीन अशा क्रमांकाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कोट्यावधीचे प्रेम-माया घेत, एक प्रकारे ठेकेदारांना कृष्णा नदीच देऊन टाकली होती. पुन्हा वाळू आणि माती उत्खनन सुरू होणार असल्याने या ठिकाणचे ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकारी खुर्चीला चिकटून बसण्याच्या तयारीत असल्याचे लोक बोलत आहेत, असे पाटील यांनी बोलताना नमूद केले.
मलईदार खुर्ची ताब्यातून जाऊ नये म्हणून, या मंडळींनी मिळवलेली प्रेम-माया खिशात घालून शासकीय बदली प्रक्रियेला गुंडाळून ठेवून स्वहितार्थ बदलीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्याची माहिती समजून येत आहे. त्यामुळे बदली प्रक्रिया पारदर्शी आणि नियमाप्रमाणे करण्यात यावी अन्यथा आपण केलेल्या बदली प्रकरणी मला व माझ्या संघटनेला न्यायालयात दाद मागावी लागेल असे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.