मा.मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व बंधू संजय यांचे मार्फत म्हाडा ,गृहनिर्माण विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून केली 33 लाखाची फसवणूक !
आमची पोलीस ठाण्यात व यड्रावकर साहेबांशी ओळख आहे, तुम्हास खोट्या केसमध्ये अडकवीण, रात्रीतून मारून टाकून गायब करण्याची धमकी !
इचलकरंजी/अब्दुललाट/शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
आमची ना.मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व त्यांचे बंधु संजय पाटील यड्रावकर यांचे मार्फत तुम्हाला म्हाडा ,गृहनिर्माण संस्था, मंत्रालय मंबई या विभागामध्ये शासकीय नोकरी लावतो, असे सांगून दशरथ गणपती काळे व शरद गणपती काळे (रा.अब्दुललाट) यांनी 33 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा तक्रार अर्ज विशाल शांतिनाथ मंडपे व दीपिका विशाल मंडपे या पती-पत्नींनी अप्पर पोलीस अधीक्षक इचलकरंजी यांच्याकडे दाखल केला आहे.
सदरची घटना कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्यामुळे या संदर्भात पोलीस ठाणे पातळीवर कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांच्या नजरा लावून राहिल्या आहेत. आमदार व माजी मंत्री आणि त्यांचे बंधू यड्रावकर यांचे नाव घेऊन नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची रक्कम उकळण्याचा हा पहिलाच प्रकार समोर आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शनिवारी सकाळी पीडित पती-पत्नी मंडपे यांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कुरुंदवाड पोलिसांशी संपर्क साधल्याचे समजते. कदाचित या संदर्भातील गुन्हा सोमवारी दाखल होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आमदार यड्रावकर व बंधू यांच्यामार्फत म्हाडा मध्ये ऑफिसरची शासकीय नोकरी देण्याचे अमिष दाखवून, विश्वास संपादन करून, दशरथ काळे यांनी स्वतःच्या खात्यावर 5 लाख रुपये, बंधू शरद काळे याच्या खात्यावर 5 लाख रुपये असे एकूण 10 लाख रुपये दि. 9 डिसेंबर 2024 रोजी आर.टी.जी.एस. स्वरूपात दिले. तर उर्वरीत 23 लाख रुपये रोख स्वरूपात दिली आहे. असे एकूण 33 लाख रुपये दशरथ व शरद काळे यांनी घेतली आहे.
33 लाख रकमेबाबत दशरथ काळे यांच्याकडे वारंवार मागणी करून सुद्धा त्यांनी आमच्या मागणीची दखल न घेता चालढकल करून माझी व माझ्या पत्नीची घोर फसवणूक केली आहे. रकमेसाठी दशरथ व शरद काळे या दोघांना फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटून वारंवार रकमेची मागणी करुन, विनंती केल्यानंतर दशरथ काळे यांनी आम्हास शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
पैशाची मागणी करून पुन्हा भेटण्यासाठी आलास तर आमची पोलीस स्टेशनमध्ये व यड्रावकर साहेबांशी ओळख असून तुम्हास खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली आहे. तुला रात्रीतून मारून टाकून गायब करायची माझी ताकद आहे असे धमकावले आहे.
सबब, वर नमुद दशरथ काळे व शरद काळे यांनी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणुक केलेबाबत तसेच मला माझी पत्नी व माझे सास-यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिलेबाबत गुन्हा नोंद व्हावा तसेच, दशरथ व शरद गणपती काळे यांचे विरूध्द लवकरात लवकर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी व माझ्या जिवीताचे रक्षण करावे. अन्यथा मी कलेक्टर ऑफीस कोल्हापूर येथे आत्मदहन करणार आहे. असे मंडपे यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.
तक्रार अर्जाच्या प्रती मुख्यमंत्री व गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, पोलिस अधिक्षकसाो, कोल्हापूर, पोलिस उप अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी, पोलिस निरीक्षकसाो, कुरूंदवाड यांना पाठवण्यात आल्या आहेत.