जादा नुकसान होणाऱ्या ग्रामीण भागाला सावत्रपणाची वागणूक ?, आंदोलन अंकुश आक्रमक
ग्रामीण भागाचा, उपाय योजना आराखड्यात समाविष्ट करून, निधीचे प्रयोजन करावे. अन्यथा दि. 9 जून पासून उपोषण.
शिरोळ/कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा
कोल्हापूर, सांगली जिल्ह्याबरोबर, शिरोळ तालुक्यामध्ये अलमट्टी धरणामुळे येणाऱ्या महापुरावर उपाययोजना करण्याकरिता जागतिक बँकेकडून मिळालेल्या 32 हजार कोटी रुपयांची योग्य निर्गत लागणे आवश्यक आहे, उपाययोजना म्हणून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कामाचे मोजमाप आवश्यक आहे. सध्या, कृष्णा व पंचगंगा तसेच वारणा आणि दूधगंगा नदी पात्रात निर्माण झालेले अडथळे तसेच अनावश्यक टाकलेला मुरमाचा भरावा दूर करण्याचे प्रयोजन याच रकमेतून केले जावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्याचा इशारा आंदोलन अंकुशचे जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
महापुरावर उपाययोजना आणि जागतिक बँकेकडून मिळालेले 32 हजार कोटी रुपये यासंदर्भात राजू शेट्टी यांनी केलेला आरोप तंतोतंत बरोबर असल्याची भावना पूरग्रस्त नागरिक, शेतकरी व्यक्त करीत आहेत. जिल्हास्तरावरील मंत्री, खासदार, आमदार तसेच प्रशासनाला हा निधी कधी एकदाचा खर्च करण्यास परवानगी मिळेल, याची आतुरता लागल्याची ही नागरिक बोलत आहेत. सध्या उपाययोजनेच्या अनुषंगाने डीपीआर बनवण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सांगली, कोल्हापूर ते शिरोळ दरवर्षी महापूर येत असतो. महापुराचा सर्वात जास्त फटका शिरोळ तालुक्याच्या ग्रामीण भागाला बसतो. पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा या नद्यांच्या पात्रातील अतिक्रमण काढणे, पुलांचे भराव काढून त्या ठिकाणी मोरी तयार करणे आणि नदीपात्रांचे खोलीकरण करणे गरजेचे आहे. तसेच महापूर आल्यानंतर पाण्याचा निचरा, तात्काळ होण्यासाठी उपाययोजना अमलात आणल्या तर नुकसानीची व्याप्ती कमी करता येणार आहे.
जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या प्रस्तावित विकास आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या बाबी विषयी केलेल्या मागणीला जिल्हास्तरावरून कोणतेही उत्तर आले नाही किंवा उचित कार्यवाही करण्यात आली नाही. मंजूर डीपीआर मध्ये फक्त महानगरपालिका, नगरपालिका या शहरी भागांसाठीच कामे मंजूर केली आहेत. यात ग्रामीण भागामध्ये कोणत्या उपाययोजना करण्यात येणार याचा समावेश करण्यात आला नाही.
पर्यास्त सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील परिस्थिती जैसे थे, म्हणजेच मागील पानावरून पुढे अशी राहणार आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी तात्काळ बैठक लावून निधीचे प्रयोजन करण्यात यावे, अन्यथा दि. 9 जून रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाईल असा इशारा पाटील यांनी निवेदनात दिला आहे. निवेदनावर दीपक पाटील, राकेश जगदाळे, रशीद मुल्ला, महादेव काळे यांच्या सह्या आहेत.