गांजा व अफीम विक्री आणि पोलीस टीप प्रकरणातून दीपक दशरथ मगदूम याच्या खून प्रकरणी शिरोळ पोलिसांनी प्रज्योत साळुंखे, रोहन कांबळे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, विनायक साळुंखे, परवेज शेख, प्रतीक सावंत या मुख्य संशयित आरोपींबरोबर संशयितांना रात्रीत फरारी होण्यासाठी अर्थ पुरवठा केल्या प्रकरणी कनवाड येथील आशिष ढवळे आणि घालवाड येथील ओंकार माने या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमोल सावंत यांने फिर्याद दिली आहे.
खुनाची घटना रविवारी रात्री पंचगंगा नदीवेस रोडवर, घनकचरा डेपोजवळ रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. गांजा व अफीम गोळ्याचा साठा व विक्रीची माहिती पोलिसांना देतोस या संशयातून, दिपक याचा पूर्व नियोजन करून खून करण्यात आला आहे. संशोधित आरोपींना रात्री अटक करण्याची प्रोसेस पूर्ण केली जाईल असे शिरोळ पोलिसांनी सांगितले.
दीपक हा पोलिसांना टीप देतो, असा संशय घेऊन, त्याबाबत चर्चा करायची आहे असे सांगून संशयित आरोपींनी पूर्व नियोजन करून पहिल्यांदा दीपक याला बोलावण्याकरिता “यशवंत” याला पाठवून दिल्याचे समजते. त्यानंतर अमोल याने दीपक यास मोटरसायकलवर बसवून पंचगंगा नदीवेस रोड येथे आणल्याची चर्चा आहे. उसात दडून बसलेल्या इतर संशयित आरोपींनी पहिल्यांदा दीपक यांच्या डोक्यात पाठीमागून दगड घातला. त्यानंतर कोयत्याने डोके, मानेवर आणि गळ्यावर वार केले, आणि हातातील गज पोटात घुसवला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी दीपकला वाचवण्यासाठी अमोल याने भ्रमणध्वनी वरून इतरांशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. दीपकला, मिरज सिव्हील येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, सोमवारी बारा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान संशयित, आरोपींना फरारी होण्यासाठी घालवाड येथील ओंकार माने आणि कनवाड येथील आशिष ढवळे या दोघांनी अर्थपुरवठा केल्याच्या कारणातून पोलिसांनी माने व ढवळे यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे.
गांजा आणि अफीम साठा व विक्रीची मुख्य यंत्रणा “ऋषिकेश” नावाच्या व्यक्तीकडून हलवली जात असून शिरोळची धुरा “राकेश” व “रोहन” नावाच्या युवकाकडे असल्याचे समजते. आणि “यशवंत” हा पोलिसांचा खबऱ्या असल्याचे कळते. त्यामुळे शिरोळ पोलिसांनी ऋषिकेश याच्याकडे राकेश आणि यशवंत या दोघांचा गांजा अफीम साठा व विक्री प्रकरणाबरोबर खुनाशी कोणता संबंध आहे का ? याची चौकशी, तपास करावा अशी मागणी शिरोळ शहरातून होत असल्याची समजते.