सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाधीन राहून कमिशनर यांना चौकशी करून कारवाई करावी लागणार !
इचलकरंजी : खमक्या वृत्तसेवा
इचलकरंजी येथील आर्थोपेडिक तज्ञ डॉ. अमित डी देशमुख आणि डॉ. सौरभ कुलकर्णी यांच्या विरूध्द अमृता कोले यांची प्राप्त तक्रार इचलकरंजी महानगरपालिकेचे कमिशनर यांच्याकडे पाठवली जाणार आहे. सदर घटनेतील वस्तुस्थिती तपासून दोन्ही डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार कमिशनर यांना आहेत. त्यामुळे कमिशनर यांच्यामार्फत सदरची कारवाई, कार्यवाही पूर्ण केली जाईल अशी माहिती कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती देशमुख यांनी “खमक्या”शी बोलताना दिली.
डॉ. अमित डी. देशमुख व डॉ.सौरभ कुलकर्ण यांनी बेपर्वाईपणे वैद्यकीय क्षमता नसताना जुजबी उपचार चालू ठेवून माझ्या पतीच्या जीवाशी खेळ केला आहे. केलेल्या उपचाराची खास वैद्यकीय समितीमार्फत चौकशी करावी अशा आशयाची तक्रार अमृता अमर कोले या महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी इचलकरंजी महानगरपालिकेचे कमिशनर यांना कारवाईचे अधिकार दिले असल्याचे स्पष्ट नमूद करून, बोगस डॉक्टर संदर्भात डीन मार्फत स्थापन केलेल्या समितीकडून चौकशी करून कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
अमृता कोले यांनी केलेल्या तक्रारीनंतर इचलकरंजी शहरात व वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. आता हे प्रकरण इचलकरंजी महापालिकेचे कमिशनर यांच्या पातळीवर चौकशी करून कारवाई करण्यासाठी येणार असल्याने शहरातील राजकीय, सामाजिक तसेच व्यावसायिक, उद्योग आणि सेवाभावी क्षेत्रात मोठी खळबळ उडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तक्रारदार कोले यांनी आपल्या तक्रारीत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या निकालाचा संदर्भ दिला असल्यामुळे कमिशनर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहूनच प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी लागणार आहे. त्यामुळे कमिशनर यांच्या कोर्टातील चेंडू कोणत्या दिशेने टोलवला जाणार यावर पुढील फौजदारी व न्यायालयीन बाबीची दिशा ठरणार असल्याचे समजते.