अंदाजे 13 लाखाच्या थकीत पगारापोटी 1 लाख 90 हजार रु. देऊन कामगारांची ओवाळणी करणाऱ्या ठेकेदाराला कामगारांचा झटका !
कामगारांच्या पगारापोटी नगरपरिषदेकडून 42 लाख रुपये घेतले. पण, थकीत पगार दिला नाही. चतुर, चानाक्ष पुंदे सरांचा प्रताप.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ नगरपरिषदेच्या माध्यमातून निपक्षपातीपणे, स्वच्छ, प्रामाणिक आणि विनाभ्रष्टाचार अशा त्रिसूत्री कार्यक्रमाचा अवलंब करून, सलग पाच वर्षे शिरोळ शहरातील घनकचरा उठाव करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या सह्याद्री ऍग्रो सायन्सेस कंपनीचे प्रोपा सर्जेराव पुंदे यांच्या कामगारांनी पुन्हा काम बंद केले आहे.
पुंदे यांचा ठेका कायदेशीर की बेकायदेशीर ? भ्रष्टाचार की, विना भ्रष्टाचार ? चार कोटीचा ढकला की हापला ? याचा न्यायनिवाडा लवकरच जिल्हा प्रशासन, न्यायालय तसेच पोलीस ठाण्यात होणार असल्याचे समजते. शासनाच्या नियमानुसार कोणतीही कायदेशीर पूर्तता न करता सह्याद्री ऍग्रो सायन्सेस या कंपनीने शिरोळ शहरांमध्ये सलग पाच वर्षे घनकचरा उठावाचे काम केले आहे.
शासनाकडून 78 कामगारांचा पगार घेऊन, केवळ 38 कर्मचाऱ्यांवर काम करीत, 40 कामगारांचा पगार थेट खिशात घातल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. नगरपरिषदेकडून दोन टप्प्यात 42 लाख रुपये, कामगारांच्या पगारापोटी घेऊन कामगारांना पगार न देता त्या पैशाची परस्पर गुंतवणूक करून कामगारांना विना पगार राबवून घेणाऱ्या ठेकेदार पुंदे याला कामगारांनी पुन्हा काम बंद करून अद्दल घडवण्याची चर्चा शहरात रंगली आहे.
तीन महिन्याच्या अंदाजे 13 लाख रुपये थकीत पगारापोटी, कामगारांना प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे 1 लाख 90 हजार रुपये देऊन पुंदे याने सहकार्य करण्याची भावना कामगारांपुढे व्यक्त केली होती. परंतु, सलग पाच वर्षे घनकचऱ्याचे काम करणाऱ्या कामगारांना ठेकेदार पुंदे याचा चतुरपणा, चाणाक्षपणाची जवळून माहिती आहे.
याशिवाय ठेक्यामध्ये कोणाकोणाचे संगणमत आहे, या माहितीपासून कामगार अनभिज्ञ नाहीत, ठेक्याचा कार्यकाल संपणार आहे. मात्र, तक्रारीमुळे ठेकेदाराला पुढील बिले मिळणार नसल्याचे कामगारांना समजले आहे. त्यामुळेच कामगारांनी काम बंद करून आता, तुमचे तुम्हीच, किती तन उपटायचे आहे ते, “उपटून” घ्या असा पवित्रा घेतल्याचे शहरात बोलले जात आहे.