वैद्यकिय क्षमता नसताना डॉ. देशमुख व डॉ. कुलकर्णी यांनी जुजबी उपचार चालू ठेवून रुग्णाच्या जीवाशी खेळ केला : अमृता कोले
अमृता कोले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार
इचलकरंजी : खमक्या वृत्तसेवा
इचलकरंजी येथील आर्थोपेडिक सर्जन डॉ. अमित डी. देशमुख यांनी मेंदूवरील उपचार आवश्यक असताना बेपर्वाईपणे वैद्यकीय क्षमता नसताना जुजबी उपचार चालू ठेवून माझ्या पतीच्या जीवाशी खेळ केला आहे. त्याचबरोबर डॉ. सौरभ कुलकर्णी यांनीही वैद्यकीय क्षमता नसताना डॉ. देशमुख यांच्याशी असलेल्या व्यावसायिक संबंधातून उपचार केले.
परिणामी माझ्या पतीचे शरीर दुर्बल झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षमता नसताना केलेल्या उपचाराची खास वैद्यकीय समितीमार्फत चौकशी करून डॉ. देशमुख व डॉ. कुलकर्णी यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, अशा आशयाची तक्रार अमृता अमर कोले या महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिली आहे.
अमृता कोले यांनी केलेल्या तक्रारीनंतर इचलकरंजी शहरात व वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. डॉ.लक्ष्मण बाळकृष्ण जोशी विरुद्ध डॉ. त्र्यंचक बापू गोडबोले (1969 एआयआर 128) यांच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय क्षमता नसताना उपचार सुरू ठेवणे व रुग्णास तातडीने इतर तज्ञांकडे न पाठविणे ही गुन्हेगारी स्वरूपाचे कृती आहे, असे निरीक्षण नोंदवून डॉक्टर कारवाईस पात्र आहे, असा निकाल दिला होता. याच निकालाच्या अनुषंगाने डॉ. देशमुख व डॉ. कुलकर्णी यांच्यावर कारवाईची शक्यता असून कोले यांना न्याय मिळेल, अशी चर्चा आहे.
अमर आदिनाथ कोले यांचा दि. 9 एप्रिल 25 रोजी पंचगंगा कारखाना रोडवरील बाकरेकर बसाहत या ठिकाणी अपघात झाला होता. त्यांना उपचारासाठी आर्थोपेडिक सर्जन डॉ. अमित देशमुख यांच्या दवाखान्यात दाखल केले. हात – पायांना इजा होण्याबरोबर डोक्याला जबर मार लागला होता. डॉ.अमित देशमुख यांनी त्याच दिवशी डॉ. जगवाणी यांच्या केंद्रात डोक्याचे सिटीस्कॅन केले.
अहवालात मेंदूच्या डाव्या भागात रक्तस्त्राव झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार न्यूरोसर्जन मार्फत इलाज होणे गरजेचे होते म्हणून डिस्चार्ज मागणी केली. परंतु, डॉ. देशमुख यांनी इजा गंभीर नाही, औषध उपचाराने रुग्ण बरा होईल, असे सांगून एमबीबीएस पदवीधारक डॉ. सौरभ कुलकर्णी यांच्यामार्फत उपचार सुरू ठेवले. त्यामुळे रुग्णाची अस्वस्थता वाढली. वारंवार मागणी करून सुद्धा डॉ. देशमुख यांनी डिस्चार्ज दिला नाही.
नातेवाईकांच्या हस्तक्षेपानंतर रुग्णास दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. पण डिस्चार्ज देतानाही रुग्णाचे बरे वाईट झाल्यास तुम्ही जबाबदार असाल, असा दम पत्नीला भरला. त्यानंतर त्यांना डॉक्टर चव्हाण यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या 20 ते 25 दिवसापासून उपचार सुरू आहेत. डॉ. देशमुख यांच्या हेकेखोरपणा, निष्काळजीपणा, बेपर्वाईमुळे, मुजोरपणामुळे व आर्थिक लालसेतून वैद्यकीय क्षमता नसतानाही त्यांनी उपचार सुरू ठेवले. त्यामुळे अमर यांची एक बाजू दुर्बल झाली आहे
त्यामुळे डॉ. अमित देशमुख यांच्या बेपर्वाईंबद्दल त्यांची तत्काळ चौकशी करून त्यांचेवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे ही तक्रार पाठवून त्यांचा वैद्यकीय परवाना निलंबित करावा, डॉ. सौरभ कुलकर्णी यांनीही वैद्यकीय क्षमता नसताना डॉ. देशमुख यांच्याशी असलेल्या व्यावसायिक संबंधातून उपचार केले. त्यामुळे मेंदूत नव्याने रक्तस्राव झाला. त्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी.
डॉ. देशमुख यांच्या बेपर्वाईमुळे माझ्या पतीचे शरीर दुर्बल झाले आहे. ते पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत. डॉ. देशमुख यांच्या निष्काळजीपणामुळे मला उपचारावर मोठा खर्च करावा लागला आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी, यासाठी वैद्यकीय समितीकडून अहवाल घेऊन पुढील कार्यवाही करावी, तसेच रुग्णाच्या जीवाशी आर्थिक लालसेतून जुजबी उपचार करून खेळ केल्याबद्दल संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रार अर्जात केली आहे.